मुंबई : प्रतिनिधी
जंतर-मंतर येथे आंदोलन करणा-या विद्यार्थी, पालक आणि इतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्तानंतर देशातील राजकारण तापले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा हे आंदोलन सरकारच्या शेवटाची सुरुवात ठरेल असे म्हणत राष्ट्रवादी शरदपवार गट आक्रमक झाला आहे.
जंतर-मंतर येथे सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या निदर्शकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. जंतर-मंतर परिसरातील परिस्थिती आणि आंदोलनादरम्यान नेमके काय घडले याबाबत वेगवेगळे दावे समोर येत असून, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
इंग्रजांनाही लाजवणारे सरकार :रोहित पवार
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणा-या आंदोलकांवर ब्रिटिश राजवटीत जसा लाठीचार्ज केला जात होता, तसाच प्रकार आता घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील संसदेकडे निघालेला मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा हे आंदोलन सरकारच्या शेवटाची सुरुवात ठरेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
संवादाऐवजी बळाचा वापर अस्वीकार्य : सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्ताचा तीव्र निषेध केला. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी दीर्घकाळ शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले असून त्यांच्या मागण्यांवर सरकारने संवादातून तोडगा काढायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. आंदोलनकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर करणे दुर्दैवी आणि अस्वीकार्य असल्याचेही त्यांनी म्हटले.
विद्यार्थी आता शांत बसणार नाहीत : जितेंद्र आव्हाड
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनाला उपस्थित होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतले आहे. जसे मी इतिहास सांगितला की १९७३ साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, ते आंदोलन पेटले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. तुम्ही या देशात विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंह, सुखदेव, हे सगळे लोक कॉलेजमध्ये होते. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते शांत बसणार नाहीत.
विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर करणारे सरकार भ्याड : आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडियावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा पेपरफुटीप्रकरणी न्यायाची मागणी करणा-या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या नागरिकांवर बळाचा वापर करणे हे भ्याड सरकारचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली.
सरकार विद्यार्थ्यांना घाबरले : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधत, सरकार विद्यार्थ्यांना घाबरले आहे, अशी टीका केली. संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारल्याबद्दल त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत विविध केंद्रीय संस्थांवरही आरोप केले.
दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या सर्व घडामोडींवर दिल्ली पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. काही माध्यमांमध्ये जंतर-मंतर येथे पोलिसांकडून हिंसाचार किंवा आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलन व्यावसायिक पद्धतीने हाताळले जात असून नागरिकांनी अफवा किंवा दिशाभूल करणा-या माहितीवर विश्वास ठेवू नये. तसेच परिसरात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही दिल्ली पोलिसांनी केले आहे.
हुकूमशाहीची नांदी : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, शांततापूर्ण आंदोलन करणा-या नागरिकांवर बळाचा वापर केला जात असेल आणि मतभेद दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाही नव्हे तर हुकूमशाहीचा मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंर्त्य, समता आणि बंधुता या मूल्यांशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. सत्तेला प्रश्न विचारणे, उत्तरदायित्वाची मागणी करणे आणि शांततेच्या मार्गाने मतभेद व्यक्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे. लोकशाहीची खरी परीक्षा सहमतीमध्ये नसून मतभेदांना सरकार कशा पद्धतीने प्रतिसाद देते, यावर ठरत असते, असेही त्यांनी म्हटले.
















