मुंबई : प्रतिनिधी
जंतरमंतरवर मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘पोलिस आणि प्रशासनाने या मुलांना एवढं मारलं आहे की ते गेल्या तीन दिवसांपासून जेवणही करू शकत नाहीत. आता हे सरकार पलटी करण्याची वेळ आली आहे. देशात सध्या जी हुकूमशाही सुरू आहे ती अतिशय वाईट असून राष्ट्रीय समाज पक्ष या अमानुष कारवाईचा तीव्र निषेध करत आहे.
दिल्लीतील या आंदोलनाला आता महाराष्ट्रातून मोठा राजकीय पाठिंबा मिळताना दिसत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत थेट दिल्ली गाठली. विद्यार्थ्यांवर पुन्हा हल्ला केला, तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा कडक इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
उद्धव ठाकरेंचाही केंद्रावर घणाघात
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काल जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी, सत्तेची हवा डोक्यात गेली आहे, ती काढायला जनतेला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा केंद्र सरकारला दिला. तसेच, सरकार स्वत:च्या ‘मन की बात’ लादत असून जनतेचे ऐकून घेत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
















