लातूर : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिका कर संकलन विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या मालमत्तेचा थकीत कर भरणा करावा यासाठी दि. ६ ते २० जुलै दरम्यान १०० टक्के शास्ती सुट लागू करण्यात आली होती. या सवलतीचा आज अखेरचा दिवस असून जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१०० टक्के शास्ती सुट लागू केल्याने जवळपास ६५०० नागरिकांनी त्यांच्याकडील थकित कर भरून योजनेचा लाभ घेतला आहे. परंतु सुट कालावधीत काही नागरिक वैयक्तिक कारणास्तव टॅक्स भरणा करू न शकल्याने मुदतवाढ २३ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. मुदतवाढ कालावधीत सुद्धा थकबाकीदार नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून आज सुट योजनेचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मात्र थकबाकीदार मालमत्ताधारकांवर धडक जप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून वसुलीसाठी विविध पथके स्थापन करण्यात येणार असून आज शास्ती सुटचा शेवटचा दिवस असल्याने अधिकाधिक मालमत्ताधारकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपल्याकडील थकीत कर भरून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी केले आहे.
















