लातूर : प्रतिनिधी
कधी नव्हे ती लातुरातील वाहतूक शाखा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सक्रीय झाली आहे. वाहतूक शाखेकडून सातत्याने विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीत सुधारणा करण्याबरोबरच वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठीही नवीन प्रयोग करण्यात येत आहेत. शहरातील प्रमुख १० चौकांमध्ये ‘ट्रॅफिक बुथ’ उभारले जात आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक चौकांत ‘ट्रॅफिक बुथ’ची उभारणी झाली आहे. परंतु, अद्यापही ‘ट्रॅफिक बुथ’चा वापर सुरु करण्यात आलेला नाही. ‘ट्रॅफिक बुथ’चा वापर करण्यासाठी वाहतूक शाखेकडून मुहूर्त काढला जाणार आहे की काय?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठी आणि अधिक प्रभावी कामकाजासाठी अत्याधुनिक ‘ट्रॅफिक बुथ’ उभारण्यात येत आहेत. यापैकी ५ ते ६ महत्वाच्या चौकांमध्ये हे बुथ प्रत्यक्ष साकारले आहेत. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये चौकात थांबून वाहतुकीला शिस्त लावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अतिउष्णता, मुसळधार पाऊस आणि कडक्याच्या थंडीतही त्यांना रस्त्यावर उभे राहावे लागते. मात्र आता हे ‘ट्रॅफिक बुथ’ उभारले जात असल्यामुळे पोलिसांच्या या अडचणी दुर होणार आहेत.
शहरातील राजीव गांधी चौक, पीव्हीआर चौक, संविधान चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (नवीन रेणापूर नाका), जूना रेणापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गरुड चौक, जुने गुळ मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक (अशोक हॉटेल चौक), दयानंद गेट या १० ठिकाणी ‘ट्रॅफिक बूथ’ उभारले जात आहेत. यापैकी ५ ते ६ चौकांमध्ये ‘ट्रॅफिक बूथ’ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. ‘ट्रॅफिक बूथ’ चौकातील रस्त्यांवर १ ते २ फुट उंचावर कट्टा तयार करुन उभारले जात आहेत. या उंचीमुळे येणा-या-जाणा-या प्रत्येक वाहनचालकाला कर्तव्यावर असलेले ट्रॅफिक पोलिस दुरुनच स्पष्ट दिसू शकतील. हाताचे इशारे अगदी शेवटच्या वाहनचालकांपर्यंत सहज दिसण्यास मदत होणार आहे.
















