नवी दिल्ली : बुधवारी रात्री दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. सीजेपीच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या.
या घटनेचे व्हीडीओ समोर आले असून, त्यामध्ये आंदोलक काठ्या घेऊन पोलिस अधिका-यांवर हल्ला करताना दिसत आहेत. यापूर्वी, २० जुलै रोजी सीजेपीच्या संसद मोर्चादरम्यान संघर्ष झाला होता. आंदोलक संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले होते आणि त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला होता. अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले. देशाला त्यांची गरज आहे, असे सांगून पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील, असे आश्वासन दिले. केंद्र सरकारने दिल्लीत पश्चिम बंगालमधून २० अतिरिक्त सीआरपीएफ कंपन्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून सुमारे २,००० जवानांना विमानाने आणण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील सोळा मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सर्व स्थानके पुन्हा सुरू झाली. सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आरएएफ जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही आंदोलक आरएएफ जवानाला मारहाण करताना, आरएएफच्या वाहनावर दगडफेक करताना आणि त्याची तोडफोड करताना दिसत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांवरील हल्ल्यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी घेतली. उच्च न्यायालयाने सरकारला हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे निर्देश दिले.
















