रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, गतिरोधक तसेच पुरेशा प्रमाणात रस्ते सुरक्षा उपाययोजना नसल्याने वाहनचालक व नागरिकांच्या जीविताला वारंवार धोका निर्माण होत आहे. या महामार्गावर अधूनमधून मोठे अपघात घडत असून, संबंधित विभागाकडून मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विभागास कधी जाग येणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रेणापूर शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शहरातील विविध भागात वळणे, दुभाजक, चौक आणि रस्त्यांच्या दिशेबाबत वाहनचालकांना पुरेशी माहिती मिळावी, यासाठी दिशादर्शक फलक असणे अत्यंत आवश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने विशेषत: रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. मंगळवारी रात्री दिशादर्शक फलक नसल्याने भरधाव वेगाने आलेला ट्रक चालकाचा अंदाज चुकल्याने रस्त्याच्या दुभाजकात अडकला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली मात्र या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपु-या रस्ता सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकात तसेच दुभाजकांच्या ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, स्ट्रीट लाईट आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसण्यासाठी पुरेशा प्रकाशाची व रिफ्लेक्टरची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
















