निलंगा : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण हीच ईश्वरभक्ती आणि निसर्गसेवा हीच खरी साधना या संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षलागवड अभियानांतर्गत निलंगा येथील निम्न तेरणा प्रकल्प परिसरात ६० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम बसवेश्वर सेवा केंद्र, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.
रामानंद संप्रदायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्याना हिरवेगार, सुरक्षित भविष्य मिळावे या उद्देशाने देशभर वृक्षलागवडीचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत ६ लाख ५ हजार २३५ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्यावरही विशेष भर दिला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमात बसवेश्वर सेवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेत निम्न तेरणा प्रकल्प परिसरात ६० रोपांची लागवड केली. यावेळी अशोक कांबळे, बालाजी रूपनर, त्र्यंबक स्वामी, बळवंत बिराजदार, कविता स्वामी, रेखा मोरे, मंगल कांबळे, शाम सूर्यवंशी, मनीषा जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक, सेवा केंद्राचे कार्यकर्ते आणि रामानंद संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित केली. निसर्गाची सेवा हीच ईश्वरसेवा असून, प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. निम्न तेरणा प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे परिसर अधिक हिरवागार व नयनरम्य होण्यास मदत होणार असून, या उपक्रमाचे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.
















