मुंबई : प्रतिनिधी
मोटार वाहन अधिनियमातील नमुना ‘३८ ए’ अंतर्गत देण्यात वाहन आलेल्या योग्यता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. त्याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व दोषी अधिका-यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत.
सह परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या चौकशीत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. काही प्रकरणांत १५ दिवसांनंतर प्रमाणपत्र जारी करण्यात आले. अन्य राज्यांतील परिवहन कार्यालयाने नमुना ‘३८ ए’ जारी केल्यानंतर महाराष्ट्रातील मूळ नोंदणी प्राधिका-याकडून नमुना ३८ जारी होणे अपेक्षित असताना, काही प्रकरणांत अन्य परिवहन कार्यालयांकडून तो जारी करण्यात आल्याचेही चौकशीत समोर आले आहे.
राष्ट्रीय परवाना असलेल्या काही वाहनांमध्ये व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (व्हीएलडीटी) नसतानाही नमुना ३८ जारी करण्यात आला. १ जानेवारी २०१९ नंतर उत्पादित काही प्रवासी वाहनांना व्हीएलडीटी नसतानाही योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले.
काही वाहनांमध्ये स्पीड लिमिट डिव्हाइस बसविलेले नसतानाही नमुना ३८ जारी करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, वाशी, ठाणे, अंधेरी, वडाळा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील परिवहन कार्यालयांमध्ये अशा स्वरूपाच्या अनियमितता मोठ्या प्रमाणावर आढळल्याचे समितीच्या चौकशीत स्पष्ट झाले.
नियमांना बगल देऊन फिटनेस प्रमाणपत्र
वाहनाची फिटनेस तपासणी ही प्रवासी आणि रस्त्यावरील प्रत्येक नागरिकाच्या जीविताशी संबंधित आहे. नियमांना बगल देऊन अपात्र वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्याचा प्रकार गंभीर आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सरनाईक म्हणाले.
















