नवी दिल्ली : पैशांसाठी कंटेंट प्रमोट केल्याची चूक मेटाने कबूल केली असून बाल लैंगिक शोषण सामग्री, डीपफेक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हीडीओ हटवण्यासह गंभीर चुकांवर फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी भारत सरकारची माफी मागितली आहे.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि मेटाचे चीफ ग्लोबल अफेयर्स ऑफिसर जोएल कॅप्लन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिका-यांमध्ये पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मेटाच्या अधिका-यांनी सरकारने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर झुकरबर्ग यांच्या वतीने खेद व्यक्त केला.
बैठकीत केंद्र सरकारने मेटाच्या अधिका-यांना स्पष्ट शब्दांत खडसावले की, भारत सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मची मनमानी अजिबात सहन करणार नाही. मेटा ही केवळ एक ‘मध्यस्थ’ राहिलेली नसून त्यांचा अल्गोरिदम युजर्सना कोणता आशय दाखवायचा हे ठरवतो. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना मिळणा-या ‘सेफ हार्बर’च्या कायदेशीर संरक्षणाचा लाभ मेटाला मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा सरकारने दिला होता.
















