नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) आणि कैलास पुंडलिक देवरे (वय ५५, दोघे रा. धोबीघाट, दहिवड, ता. देवळा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. शुक्रवारी रात्री देविदास ठाकरे आणि कैलास देवरे हे दोघे मोटारसायकलने दहिवडकडून देवळ्याच्या दिशेने येत होते. त्याच वेळी देवळ्याकडून दहिवडच्या दिशेने जाणा-या मारुती अर्टिगा कारने पिंपळगाव (वा.) येथील वळणावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील देविदास ठाकरे आणि कैलास देवरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला, तर अर्टिगा कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले.
















