नाशिक : प्रतिनिधी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असतानाच अचानक एक मोठा बदल यात करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोक संतप्त झाले असून आज (९ ऑगस्ट) आमदार सत्यजीत तांबे, बाळासाहेब थोरात, खासदार वाजे यांच्यासह सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन झाले आहे. याचा फटका वाहतुकीला बसला आहे.
चक्का जाम आंदोलन चाकण ते सिन्नर मार्गावर करण्यात आले. पुणे-नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे अहिल्यानगरमार्गे वळवल्याचा लोकांमध्ये राग आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सिन्नरमध्ये खासदार वाजे आणि सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
हायस्पीड रेल्वे मार्ग बदलून संगमनेरऐवजी अहिल्यानगर मार्गे वळवल्यामुळे चाकण ते सिन्नर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. वास्तविक याबाबत सरकारने एक समिती स्थापन केली असून ही समिती ६० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. मात्र, सरकार हा मार्ग का बदलत आहे आणि सर्वेक्षण झाल्यानंतर अचानक असं काय झालं की सरकारला मार्ग बदलावा लागत आहे, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. यावरून या भागात तीव्र नाराजी आहे. हा प्रश्न नुसता रेल्वेचा नाही तर संपूर्ण भागाच्या भवितव्याचा आहे, याकडे आंदोलक लक्ष वेधत आहेत.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प होत आहे. हा मार्ग मंजूर झाला असून याला बँकेनेही कर्ज मंजूर केले आहे, महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा वाटा मान्य केला आहे. हा सरळ मार्ग असताना हा मार्ग बदलण्यात आला आहे. याला बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, खासदार राजाभाऊ वाजे आदी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. हा सेमी हायस्पीड मार्ग पुणे ते नाशिक व्हाया संगमनेर असा असताना तो नारायणगाव येथील जीएमआरटीचे कारण देत अहिल्यानगर मार्गे वळवण्याचा घाट घातला आहे. याला दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. या विरोधातच चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुमारे २३५ किलोमीटरचा आहे. या ट्रेनचा वेग ताशी २०० किमी ठेवण्याचे नियोजन आहे. यात राज्य सरकारचा आर्थिक सहभाग आहे. हा मार्ग संगमनेरमधून जाणार आहे. याला केंद्रानेही मंजुरी दिली आहे. पण, अचानक नारायणगावमधील जीएमआरटी रेडिओ दूर्बिणींवर याचा परिणाम होईल, असे सांगून हा मार्ग बदलण्यात येत आहे. आता संगमनेरऐवजी अहिल्यानगर मार्गे रेल्वेचा मार्ग होत आहे. याला पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सरळ मार्ग असताना तो आडमार्गाने का नेण्यात येत आहे, असा सवाल चक्का जाम आंदोलनात उतरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
















