बारामती : प्रतिनिधी
बारामतीमध्ये आज पुन्हा एकदा विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त झालेले हे प्रशिक्षण विमान ‘कार्व्हर एव्हिएशन’ या संस्थेचे असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर ‘टॅक्सिंग’ करत असताना हा अपघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कारवाई सुरू केली आहे. हे विमान नक्की कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा कारणामुळे कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, विमानात नेमके किती जण होते आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची अद्याप माहिती आलेली नाही. या घटनेनंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली असून, दुर्घटनेचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
विमान कोसळण्याच्या या घटनेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अशा घटना वारंवार घडत आहेत. यामागे नेमका तांत्रिक बिघाड आहे की आणखी काही कारण आहे, याचा सरकार नक्कीच गांभीर्याने विचार करेल आणि चौकशी करेल. यासोबतच, प्रवाशांनीही अशा प्रवासात काळजी घेतली पाहिजे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या
बारामतीतील या घटनेमुळे याचवर्षी जानेवारी महिन्यात घडलेल्या एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी विमान अपघाताच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात एक खासगी चार्टर्ड विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्यासारख्या राज्याच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्याच्या अशा अचानक झालेल्या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
















