बोगोटा : दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोमवारी रात्री आलेल्या ७.४ तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला असून ८०० जण जखमी झाल्याची माहिती आहे.अधिका-यांच्या मते, देशभरात ८६ इमारती कोसळल्या, तर १,५०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. १८ आरोग्य केंद्रे आणि ५२ शाळांनाही नुकसान झाले आहे. याशिवाय ७ विमानतळांवरील काम थांबवण्यात आले आहे.
पाच शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी आपत्कालीन समितीची बैठक बोलावून मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. एकट्या पेरेरा शहरात १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर भूकंपाच्या केंद्रापासून ६४ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. राजधानी बोगोटासह अनेक शहरांमध्येही तीव्र धक्के जाणवले. खबरदारी म्हणून लोक इमारतींमधून बाहेर पडून रस्त्यावर आले.
चोको आणि रिसाराल्डा येथे मोठे नुकसान
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार, भूकंप सोमवारी सकाळी ७:३४ वाजता आला. याचे केंद्र चोको परिसरात सॅन जोसे डेल पालमारजवळ होते. भूकंपाची खोली १०७ किलोमीटर होती.















