मुंबई/ पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत असला तरी, जोरदार पावसासाठी आवश्यक असलेली हवामान प्रणाली सध्या सक्रिय नाही. त्यामुळे दमदार पावसाची शक्यता कमी असून, ऊन आणि पावसाच्या खेळामुळे उकाडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील ४-५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील ४-५ दिवस हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. सध्या या भागासाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस येथे हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने शेतक-यांना दमदार पावसासाठी आणखी वाट पाहावी लागेल. विदर्भातही बहुतांश भागात पुढील ४-५ दिवस हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून, पावसाचा कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता
मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागात पावसाची तूट अद्याप कायम आहे. एकंदरीत, सध्या राज्यात दमदार पावसाची शक्यता नसून, बहुतांश भागात हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
















