२ संचालक, १ सहसंचालकांची नियुक्ती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) मध्ये प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून, ३ नवीन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २ संचालक आणि एका सहसंचालकाचा समावेश आहे. आगामी काळात हे अधिकारी एनटीएत प्रमुख भूमिका बजावतील, असे सांगण्यात आले.
यामध्ये आयपीएस अधिकारी रवीकुमार सिंह यांची एनटीएच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबतच आयएएस अधिकारी प्रसन्न वेंकटेश यांच्यावर एनटीए संचालक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. हे दोन्ही अधिकारी एनटीएच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त आयआरएस अधिकारी अमित समदरिया यांची सहसंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली. या तिन्ही अधिका-यांच्या नियुक्तीमुळे एनटीएच्या प्रशासकीय संरचनेत महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहे. ही नियुक्ती एनटीएच्या कारभारात नवीन दृष्टीकोन आणि कार्यक्षमता आणण्यास मदत करेल, असे मानले जात आहे.
तिन्ही आदेशांमध्ये कार्मिक मंत्रालयाच्या परिपत्रकाचा संदर्भ देण्यात आला असून, त्यानुसार नियुक्त अधिका-यांना आदेश जारी झाल्यापासून तीन आठवड्यांच्या आत नवीन जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. असे न केल्यास सेंट्रल स्टाफिंग स्कीममधून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
अलीकडेच सरकारने एनटीएच्या परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदलांची घोषणा केली होती. यात पेपर तपासणीसाठी चारस्तरीय प्रक्रिया लागू करणे समाविष्ट आहे. सरकारने ६०० तज्ज्ञांना काढून टाकण्याची आणि विषय तज्ज्ञांना समाविष्ट करण्याचीही घोषणा केली. या व्यतिरिक्त परीक्षा पद्धतीत अनेक इतर बदलही केले जातील, असे सांगण्यात आले. यापूर्वी २५ जुलै रोजी नीट पेपरफुटी प्रकरणात एनटीएने ४७ अधिका-यांना बडतर्फ केले होते. बडतर्फ केलेल्या अधिका-यांवर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला.
पेपरफुटी प्रकरणामुळे
आता मोठा फेरबदल
३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-यूजी-२०२६ परीक्षेचा पेपर फुटला. त्यावेळी सरकारने आणि एनटीएने नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेतली. तसेच या काळात या प्रकरणाची सखोल चौकशी करून १३ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आता सीबीआय लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. दरम्यान यामुळेच आता एनटीएत मोठा फेरबदल होत आहे.
















