मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला कधीही विरोध केलेला नाही, उलट काँग्रेसच महिला आरक्षणाची खरी जनक आहे, असा जोरदार पलटवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नाशिक दौ-याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाने केलेल्या आंदोलनावर प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने कधीही विरोध केला नाही: काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, हे कोणत्या मूर्खाने सांगितले? २०२३ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने घटनादुरुस्ती विधेयक आणले, तेव्हा काँग्रेसने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. महिला आरक्षणाचे मूळ जनक आम्हीच आहोत.
भाजपला महिला आरक्षण लागू करायचे नसून केवळ उत्तर-दक्षिण वाद निर्माण करायचा आहे आणि जनगणनेच्या नावाखाली टोलवाटोलवी करायची आहे. महिलांच्या अधिकारांवर बोलणा-यांनी आधी सांगावे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एखाद्या महिलेला प्रवेश मिळतो का? संघात एखादी महिला कधी ‘सरसंघचालक’ होऊ शकते का? मनुस्मृती मानणा-यांनी आम्हाला महिलांचे हक्क शिकवू नयेत.
प्रत्येक पेपरफुटीमागे भाजपच्या बड्या नेत्यांचा हात
एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकार आणि राज्यातील सातत्यपूर्ण पेपरफुटीवर चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन-दोन कोटींना पेपर विक्री : ‘ कॉलेज प्रवेश असो वा सरकारी नोक-या, राज्यात प्रत्येक पेपर फुटत आहे. या पेपरफुटीच्या गोरखधंद्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार आहेत. पेपरफुटीमध्ये कोणतीही मोठी जोखीम राहिलेली नाही; कारण कोणालाही कडक शिक्षा होत नाही, मात्र बक्षीस प्रचंड मिळते. दोन-दोन कोटी रुपयांना एक-एक पेपर विकला जात आहे.’
भाजपच्या कार्यकाळात १५० हून अधिक परीक्षांचे पेपर फुटले, पण एकाही मोठ्या सूत्रधाराला शिक्षा झालेली नाही. गरीब विद्यार्थ्यांचे हे शोषण आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा केली पाहिजे.
कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्गात ४० टक्के कमिशनचा आरोप
नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांवर बोलताना त्यांनी सरकारवर थेट भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले. नाशिक खड्ड्यांचे शहर झाले आहे. नाशिक कुंभमेळ्याचा कोणताही सविस्तर प्रकल्प अहवाल अद्याप तयार नाही. स्थानिकांना आणि जनतेला विश्वासात न घेता केवळ ठराविक ठेकेदारांना खिरापत वाटण्याचे काम सुरू आहे. कुंभमेळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. १ लाख कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग हा केवळ ४० टक्के कमिशन लाटण्यासाठी रेटला जात आहे.
















