सना : येमनमधील हुथी बंडखोरांनी दक्षिण लाल समुद्रातील आणखी दोन महत्त्वाच्या बेटांवर कब्जा केला आहे. येमन सरकारच्या म्हणण्यानुसार, हुथींनी ग्रेटर हनीश आणि लेसर हनीश बेटांवर आपले सैनिक तैनात केले आहेत. ही बेटे बाब-अल मंदेब सामुद्रधुनीपासून सुमारे १६० किमी उत्तरेला आहेत.
यापूर्वी, गेल्या आठवड्यात हुथींनी लाल समुद्राच्या किना-यावरील मोखा बंदर शहर आणि बाब-अल मंदेबमधील मायून बेटावरही कब्जा केला होता. या दोन्ही ठिकाणी सौदी अरेबियाच्या पाठिंब्याने असलेल्या यमनच्या सरकारी सैन्याचे नियंत्रण होते. हुथींनी या बेटांवर कब्जा केल्यामुळे लाल समुद्राच्या सागरी मार्गावरील त्यांचे वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे. बाब-अल-मंदेब हा आशियातून युरोपला जाणा-या जहाजांसाठी एक छोटा मार्ग आहे. येथून गेल्यानंतर जहाजे सुएझ कालव्यामार्गे भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचतात.
सौदीमध्ये येमन सीमेजवळ एक प्रोजेक्टाइल पडल्याने दोन लोक जखमी झाले. एका मशिदीचे आणि काही इतर इमारतींचेही नुकसान झाले. येमनमध्ये हुथीविरुद्धच्या लढाईत गेल्या चार आठवड्यांत सरकार-समर्थित ५०० हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. सरकारच्या समर्थनार्थ लढणा-या नॅशनल रेझिस्टन्स फोर्सने हा दावा केला आहे. संस्थेनुसार, याच दरम्यान होदेदा आणि ताईज प्रांतांमध्ये १,००० हून अधिक हुती सैनिकही मारले गेले. मात्र, हुथीनी या आकडेवारीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या दरम्यान येमेनी सरकारने लाल समुद्राच्या किना-यावर आणखी सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या एका अधिका-याने गेल्या आठवड्यातील पराभव मान्य करत सांगितले की, सरकारी सैन्य पुन्हा त्या भागात परत येईल.
येमनमध्ये सरकार आणि हुथी यांच्यात हल्ले तीव्र
येमन आणि सौदीच्या सैन्याने रविवारी लाल समुद्राजवळ हुथीच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून हुथीनी सौदी अरेबियावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केल्याचा दावा केला. हल्ल्याच्या शक्यतेमुळे सौदी अरेबियातील अबहा आणि खमिस मुशैत या दोन शहरांमध्ये सायरन वाजवण्यात आले. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले.
















