नांदेड : प्रतिनिधी
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाहतूक, विक्री व रिफिलिंग करण्याच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वाहनासह लाल व पिवळ्या रंगाचे एकूण ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडर, असा अंदाजे ८ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका वाहनातून व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उस्माननगर रस्त्यावरील कोहिनूर मिलच्या विरुद्ध बाजूस छापा टाकला. त्यावेळी छोटा हत्ती( क्र. एमएच-२६-सीएच-४६७७) हे वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले.वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आढळून आले.
आरोपी श्यामलाल शंकरलाल सारन ( व्यवसाय—चालक, सध्याचा पत्ता शिवाजीनगर, मुखेड, ता. मुखेड ) असा असून, तो मूळचा बोजासर, जि. फलोदी, राजस्थान येथील आहे. सदर गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्री व रिफिलिंगसाठी आणल्याचे चौकशीत समोर आले. मात्र, त्याच्याकडे या सिलिंडरची वाहतूक व विक्री करण्यासाठी कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे आढळून आली नाहीत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहनाची अंदाजे किंमत २ लाख ३४ हजार रुपये असून, भारत कंपनीचे व्यावसायिक गॅस सिलिंडर एकूण ५२, प्रत्येकी अंदाजे ४ हजार ५०० रुपये किमतीचे, असा अंदाजे ६ लाख रुपये किमतीचा गॅस सिलिंडरचा साठा जप्त करण्यात आला. वाहन व सिलिंडर मिळून एकूण ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी आरोपी श्यामलाल शंकरलाल सारन याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि. बी. ई. चव्हाण, पोलिस अंमलदार लक्ष्मण जाधव, जमीर व गुरुनाथ कारामुंगे यांनी कारवाई केली.
















