नांदेड : प्रतिनिधी
एकाच शेतजमिनीची वारंवार ३५ नागरिकांना विक्री करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणा-या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींना पकडण्यात येईल,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पत्र परिषदेत दिली.
बनावट सातबारा उतारे, विक्रीचे दस्तऐवज व सौदा चिठ्ठया तयार करून जिल्ह्यातील अधार्पूर तालुक्यातील मौजे मेंढला खुर्द येथील एकाच शेत जमिनीची ३५ नागरिकांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. त्याबाबत माहिती देताना डॉ. निलाभ रोहन म्हणाले की,या प्रकरणात आतापर्यंत ३५ नागरिकांची फसवणूक करून तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपये लाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शहर उपविभागीय पोलिस पथक, स्थानिक गुन्हे शाखा व भाग्यनगर गुन्हे शोध पथकाच्या संयुक्त कारवाईत टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नागोराव गायकवाड (वय ३८, रा. शिवरायनगर, मालेगाव रोड, नांदेड; मूळ रा. गणपूर, पो. कामठा, ता. अधार्पूर) याने देवेंद्र शर्मा यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन केला. अधार्पूर तालुक्यातील मौजे मेंढला खुर्द येथील शेतजमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून आरोपी राहुल गायकवाड विशाल गायकवाड व माणिक उर्फ बाबू सरोदे यांनी बनावट कागदपत्रे व सातबारा तयार करून जागेची पाहणी घडून आणली होती. सदर जमिनीचा व्यवहार १ कोटी २६ लाख रुपयांना ठरवून नोटरीकृत सौदाचिठ्ठी करण्यात आली. त्यानंतर शर्मा यांच्याकडून ३५ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारण्यात आली. मात्र, व्यवहारानंतर त्याच जमिनीचे बनावट कागदपत्रांच्या आधारे इतरांशीही व्यवहार केल्याचे समोर आले.
या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गु.र.नं. २२६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे नांदेड शहर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. सखोल तपासात या टोळीने एकाच मिळकतीचे वारंवार बनावट दस्तऐवज तयार करून वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या व्यवहारांमध्ये स्थानिक प्रॉपर्टी डीलर्स व दलालांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात राहुल नागोराव गायकवाड याला १३ सप्टेंबर रोजी, जखाजी ऊर्फ बंडू धोंडजी पावडे (वय ४३, रा. घर क्र. ५१/१, मु.पो. पुयणी) याला १४ सप्टेंबर रोजी, तर अमोल अशोकराव मालेगावकर (वय ४२, रा. घर क्र. ४४, ज्योतिबानगर, माणिकनगरच्या पाठीमागे, तरोडा बु.) याला १५ सप्टेंबर रोजी अटक केली. राहुल गायकवाड व अमोल मालेगावकर हे पोलिस कोठडीत असून जखाजी पावडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आतापर्यंत १६ नागरिकांचे जबाब नोंदवून १४ सौदाचिठ्ठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच नमूद आरोपींविरुद्ध यापूर्वी न्यायालयात सुमारे १२ दिवाणी व फौजदारी दावे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी रामेश्वर वेंजने, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाने तसेच भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने केली आहे.
















