मुंबई हायकोर्टाचे आदेश, खंडपीठाने स्वत: होऊन घेतली दखल
अहवाल सादर करावा,
आज तातडीने सुनावणी
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सण आणि उत्सवांच्या काळात होणा-या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. त्यांच्या मुद्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. आता मुंबई हायकोर्टाने सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषणाच्या मुद्याची सुमोटो दखल करून घेतली आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि अंमलबजावणीचा अहवाल मंगळवारी सादर करण्याचे सरकारला आदेश दिले.
हायकोर्टाने आमचा कोणत्याही धर्माच्या सणाला विरोध नाही. मात्र, इतरांना त्रास होऊ नये, असे निरीक्षण नोंदविले आहे. नियम मोडणा-यांची साऊंड सिस्टीम जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशदेखील पोलिसांना देण्यात आले आहेत. हायकोर्टाने हे आदेश वर्षभरातील सर्व धर्मांच्या मिरवणुकांना लागू राहणार असल्याचे सांगितले. नागपूर खंडपीठाने आधीच १ नोव्हेंबरपर्यंत क्षमतेपेक्षा जास्त आवाज करणा-या डीजेंवर बंदी घातली आहे.
डीजेबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला. डीजेवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी डीजे व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असताना जिल्ह्यात विविध ठिकाणी डीजे व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे.
पुण्यात उठविला आवाज,
नागपुरात थेट डीजेवर बंदी
पुण्यातील विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून सण आणि उत्सवांच्या काळातील ध्वनीप्रदूषण आणि रहदारीस अडथळा हे दोन मुद्दे आक्रमकपणे मांडले होते. विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या मुद्यांना समर्थनही मिळाले होते. दरम्यान, नागपूर शहरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजेबंदी जाहीर केली आहे.
















