बुलडाणा : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये भाजपमध्ये जाण्याची घोषणाही केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यात हा हादरा बसणार होता. त्याच वेळी काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी थेट आपल्या नेत्याला फोन करून काँग्रेसमध्ये थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलत आपण कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले.
चिखली विधानसभेचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा विचार कालच फेसबुक लाईव्ह करत बोलून दाखवला होता. ते भाजपात जात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या सहका-यांना आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले होते. चिखली विधानसभेचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल तसे जाहीर केल्यानंतर आज लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना थेट फोन केला आणि तुमची पक्षाला गरज आहे. तुम्ही फेरविचार करावा, असे म्हटले. त्यावर बोंद्रे यांनी तुम्ही मला फोन केलात, आता सर्वकाही गमावले तरी मी काँग्रेस आणि तुमच्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
















