जिंतूर : (एम. ए. माजीद)
एस. टी. महामंडळाचे कोट्यावधीचे देयके थकीत असल्याने कंत्राटदार हेनेकस कंपनीचे कंत्राट महामंडळाने रद्द केल्याने गेल्या ३ महिन्यांपासून पार्सल सेवा ठप्प झाली आहे. यामुळे व्यापा-यांना अडचणींचा सामना करावा लागत असून महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे या पार्सल व्यवसायावर उदरनिर्वाह चालविणा-या अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
एस. टी. महामंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रातील ३ वर्षाचे पार्सल वाहतुकीचे कंत्राट १ डिसेंबर २०२४ ते ३० डिसेंबर २०२७ पर्यंत महामंडळाने हेनेकस कंपनी पुणे यांना दिले होते. या कंपनीने महाराष्ट्रातील सुमारे ३०० बस डेपोवर पार्सल ऑफिस प्रतिनिधींची मोठ्या रकमेचे डिपॉझिट घेऊन नियुक्त केली आहे. हेनेक्स कंपनीने कोट्यावीध रुपयांची देयके थकीत ठेवल्याने १९ जून रोजी अचानक महामंडळोन कंपनीचे पार्सल कंत्राट रद्द केले. महाराष्ट्रातील सर्व पार्सल ऑफिसचा ताबा महामंडळाने घेतला असून तेव्हापासून सर्व पार्सल ऑफीस बंद आहेत.
या विरोधात सदरील कंपनीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण कंपनीला यश मिळाले नाही.
सदरील कंपनीचे कंत्राट रद्द केल्यावर महामंडळाने नवीन टेंडर काढून कंत्राट देणे आवश्यक होते. परंतू ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी याबाबत महामंडळाने ठोस निर्णय घेतलेला नाही. महामंडळाने तात्पुरती स्वत: व्यापा-यांना पार्सल वाहतुकीची सुविधा देणे गरजेचे होते. परंतू कुठलेही पाऊल न उचलल्याने परभणी, हिंगोली विभागातील परभणी येथे एकमेव एसटी महामंडळाचे पार्सल ऑफिस सुरू आहे. इतर सर्व ठिकाणचे पार्सल ऑफिस बंद पडलेले आहेत. त्यामुळे व्यापा-यांना मात्र पार्सल सेवेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
डिपॉझीट परताव्याकडे प्रतिनिधींचे लागले लक्ष
एस.टी. महामंडळाने हेनेकस कंपनीचे पार्सल सेवेचे ३ वर्षाचे कंत्राट दीड वर्षातच रद्द केले आहे. या पार्सल कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी २० लाखाहून अधिक तर तालुक्याच्या ठिकाणी ४० ते ५० हजार रुपयांचे डिपॉझिट त्या ठिकाणच्या प्रतिनिधींनी कंपनीकडे भरणा केलेला आहे. परंतू पार्सल सेवा बंद होऊन ३ महिने लोटली तरी प्रतिनिधींना डिपॉझिट परत मिळालेले नसून ते कधी परत मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
















