पुणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव घेण्यात आले होते. त्यांचा अशोक खरात यांच्यासोबतचा एक फोटो समोर येताच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वाद चांगलाच पेटला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये नवा वाद पेटला आहे. कोणी लाली, लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही, असा बोचरा वार रुपाली चाकणकर यांनी ठोंबरे यांच्यावर केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी नुकतीच बोलताना स्वत:ची तुलना सावित्रीबाई फुले यांच्याशी केली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ‘‘त्यांनी येऊन मी सावित्रीची लेक आहे, मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे रुपाली चाकणकर तुमची पात्रता नाही सावित्री माईंचे नाव घेण्याची. कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची हयात गेली. अंधश्रद्धेच्या विरोधात लोकांची जनजागृती करण्यामध्ये आणि तुम्ही काय केलं? तुम्ही राज्य महिला आयोगावर जिथे महिलांना वाचवायचं होतं, महिलांना आधार द्यायचा होता त्याच महिलांना भोंदूबाबाच्या शिकारीसाठी अलगदमध्ये पोहोचवणा-या तुम्ही आहात’’ असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, रुपाली चाकणकर या आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. रुपाली चाकणकरांवरती जे विनाकारण आरोप केले गेले ते आरोप हे खोटे होते. हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध केलेले आहे आणि म्हणूनच या प्रत्येक ठिकाणी रुपाली चाकणकर लढत आहे. कारण ही महाराष्ट्राची लेक आहे. त्यामुळे खोट्या आरोपांना त्या बळी पडणार नाहीत. पण चारित्र्यावर उडणारे शिंतोडे हे २०० वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी सहन केले होते. आजही ही रुपाली सावित्रीची लेक म्हणून लढत आहे. पण हे कमबॅक वगैरे होण्याचा प्रश्नच येत नाही. रुपाली चाकणकर लढताना दिसली आणि तुमच्या सगळ्यांमध्ये आहे.
















