परभणी : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतक-यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि अडचणींची आस्थेवाईकपणे चौकशी करत धीर दिला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी परभणी तालुक्यातील ताडपांगरी, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, सिरसम शे., डोंगरजवळा या गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी पीक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी शासन आपल्या पाठीशी असून परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेतला जात आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
शेतक-यांना तातडीने मदत मिळण्यासाठी अहवाल शासनाकडे तात्काळ सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताडपांगरी येथील पिक पाहणीच्या वेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, मंडळ अधिकारी सचिन शिंदे, प्रवीण खाडे, ग्राम महसूल अधिकारी दीक्षा खंडारे यांच्यासह कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाची पाहणी
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, सिरसम शे., डोंगरजवळा येथील शेतक-यांच्या शेतावर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. महातपुरी येथील शेतकरी राम मुलगीर यांच्या शेतात मुदतपूर्व पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. त्याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतक-यांशी संवाद साधताना जिल्हाधिका-यांनी त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि घाबरून जाऊ नका, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असा धीर त्यांना दिला.
















