पुणे/नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी वा-यांनी आता देशाचा निरोप घेतला. दक्षिणेकडील राज्यांतूनही माघार घेतल्याने यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम अधिकृतरीत्या संपुष्टात आला आहे. यंदा देशात सरासरीच्या तुलनेत १३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा १६ मे रोजी अंदमानात, तर ४ जून रोजी केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन झाले. ९ जुलैपर्यंत त्याने संपूर्ण देश व्यापला होता.
सुरुवातीपासूनच पावसाळ्यावर एल निनोचा प्रभाव राहिला. जून महिन्यात देशात सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. जुलैमध्ये १०१ टक्के पावसाची नोंद झाल्याने सरासरी भरून निघण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने पुन्हा ओढ दिली. ऑगस्टमध्ये सरासरीच्या ८४ टक्के, तर सप्टेंबरमध्ये ९२ टक्के पाऊस झाला. परिणामी, संपूर्ण हंगामात सरासरीच्या ८७ टक्के पावसाची नोंद झाली. राजस्थानच्या पश्चिम भागातून १९ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. साधारण महिनाभराच्या प्रवासानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्याने देशातून माघार घेतली. या काळात परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसला नाही. त्यामुळे पाणीसाठ्यांवरील ताण आणि आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनाला सुरुवात झाली आहे.
मार्च २०२७ पर्यंत एल निनोचा प्रभाव
प्रशांत महासागरातील एल निनोच्या स्थितीचा आगामी हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोचा प्रभाव डिसेंबरपर्यंत आणखी वाढू शकतो आणि मार्च २०२७ पर्यंत तो कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आगामी हिवाळ्याच्या हंगामावरही होऊ शकतो. त्यामुळे देशातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कडाक्याच्या थंडीसाठी प्रतीक्षा
हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, राजस्थान वगळता देशाच्या बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या हिवाळ्यात थंडीची तीव्रता कमी राहण्याची शक्यता असून कडाक्याच्या थंडीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
















