जळकोट : प्रतिनिधी
नांदेड-जांब-जळकोट-उदगीर-तोगरी पुढे गुलबर्गा हा एन. एच. ५० क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे काम आता मानसपुरी व तिरुका या दोनच गावाजवळ थांबलेले आहे. रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाल्यामुळे याचा फायदा निश्चितच झालेला आहे. जळकोटकरांना नांदेड टप्प्यात आलेले आहे. असे असले तरी पूर्वी या रस्त्यावर जसे वळण होते तसेच वळण आजही कायम आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आता अपघात मार्ग बनलेला आहे.
नांदेड-जांब-जळकोट-उदगीर-तोगरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम झालेले आहे, नांदेड ते उदगीर असा राष्ट्रीय महामार्ग पुर्ण झाल्याल्यामुळे या महामार्गावरील गावांचा कायापालट झाला . जळकोट सारखे अनेक गावे राष्ट्रीय महामार्गावर आली . यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचा फायदा नक्कीच अनेक गावांना होत आहे . हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे या एन. एच. ५० वर वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . रस्ता मोठा आणि रुंद झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल असे वाटत असताना आता अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
उस्माननगर ते जळकोट एका कंत्राटदारालामार्फत तर जळकोट ते तोगरी एका कंत्राटदारालामार्फत असे दोन विभाग करून कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम झालेले आहे. या मार्गावरील पूर्वीचे धोकादायक वळण आहेत ते कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन देखील अनेक ठिकाणी धोकादायक वळण कायम आहेत. पिंपरी ते नळगीर, एकुरका पाटी, तिरुका, कोळनूर, पाटोदा (बु), जळकोट शहरातील महात्मा फुले चौक, शिंदगी फाटाख दिग्रस (बु), दिग्रस (खु), हरबळ, गऊळ, फुलवळ, संगुचीवाडी, कलंबर बु., उस्माननगर, पिंपरी, नावंदी पाटी आदी ठिकाणी वळण रस्ता कायम आहे. यामधील अनेक ठिकाणे आहेत की या ठिकाणी गाडीचा वेग कमी नाही झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना धोकादायक वळण कमी केले असते तर चांगले झाले असते अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे . राष्ट्रीय महामार्गावरील संगुची वाडी जवळ एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला आहे तर दुस-या बाजूचा रस्ता मात्र अपूर्णच आहे हा रस्ता उकरून ठेवल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक, कोळणुर, दिग्रस खु. येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर धोकादायक वळण आहे . राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग देखील अतिशय जास्त असतो आणि या ठिकाणी चक्क यु टर्न आहे . यामुळे वाहन चालवताना या ठिकाणी गाडीवर अनेक वेळा ताबा राहत नाही यामुळे एकतर गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी होत आहे किंवा समोरासमोर धडक होत आहे . तसेच अनेक वेळा समोरील वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले यामुळे या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे . या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० ला अतिरिक्त जमीन घेण्यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे महामार्ग विभागाने वळण रस्ते कमी केलेले नाहीत.
एकीकडे नांदेड ते बिदर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० म्हणून ओळखला जातो तर दुसरीकडे हा मार्ग महामार्गासारखा वाटतच नाही . अनेक गावांमध्ये चक्क महामार्गावरच उकिरडे , महामार्गावरच वाळूचे साठे , महामार्गावरच वाहने थांबवणे , असे प्रकार सर्रास घडून येत आहेत यामुळे महामार्ग विभागाच्या अधिका-यांनी याकडे लक्ष देऊन महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याची गरज आहे.















