निलंगा : प्रतिनिधी
तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा नगर परिषद सभागृहात तालुकास्तरीय ‘सेवा संकल्प अभियानाचा’ समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
महात्मा गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांनी केली. याप्रसंगी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सतीश पाटील आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.















