किल्लारी : वार्ताहर
मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणसाचा अमूल्य वेळ वाया जात आहे. तासनतास मोबाईलच्या वापरामुळे वाचन संस्कृती अत्यंत कमी झाली आहे परंतु माणसाच्या जीवनात वाचनाला खूप महत्त्व आहे. वाचनामुळे माणसाला माणूसपणाचे दर्शन घडते समाज, राज्य व प्रशासन व्यवस्था, संस्कार आणि मानवी मूल्य कळतात म्हणून प्रत्येकाने काही ना काही वाचलेच पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले.
किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. पी. कांबळे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप चव्हाण, ग्रंथपाल डॉ. व्ही. व्ही. गिरी, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. पांडुरंग मगर यांची उपस्थिती होती.
प्रा.डॉ. गायकवाड यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञान, शिक्षण, इस्रो, डीआरडीओ आणि राष्ट्रनर्मितीत उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण, वाचन आणि ज्ञान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, असा संदेश प्रा. अशोक गायकवाड यांनी दिला. डॉ. कलाम यांचे जीवन आणि कार्य विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देते, असेही त्यांनी नमूद केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय विकसित व्हावी. विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी पुस्तकांचे वाचन करावे. हा या उपक्रमामागील उद्देश होता.
वाचन ही केवळ शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली नसून व्यक्तिमत्त्व विकासाचेही महत्त्वाचे साधन आहे. हा संदेश प्रा.डॉ. अशोक गायकवाड यांनी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. डी. एन. भोयर यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संदीप चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक- प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
















