जिंतूर : नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गेश्वरी युवती मंडळ जिंतूर यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणा-या या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मीरा काळे, मंदा डुबे, नेहा काचगुंडे, अश्विनी कटारे, मिठू साहू, कांचन काळे, रत्नमाला कटारे, ममता कुबडे, आलका इंगळे आणि कुसुम रोकडे या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले.
दुर्गेश्वरी युवती मंडळाच्या वतीने मुली व महिलांसाठी रांगोळी, चालता-बोलता, डिश डेकोरेशन, अभिनय, संगीत खुर्ची, एक मिनिट स्पर्धा, होम मिनिस्टर, दांडिया, उखाणे स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. मनोरंजनासोबतच महिलांमधील आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून अरुण शहाणे, गंगाप्रसाद घुगे, योगेश बाभनकर, सुकाळे उपस्थित होते. महोत्सवादरम्यान दररोज आयोजित करण्यात आलेल्या विचार प्रबोधन उपक्रमातून मान्यवरांनी महिलांना प्रेरणादायी विचारांची शिदोरी दिली. संपूर्ण स्पर्धांचे नियोजन व सूत्रसंचालन करणारे प्रकाश डुबे यांचा मंडळातर्फे ग्रंथभेट व शाल अर्पण करून विशेष सत्कार करण्यात आला. दुर्गेश्वरी युवती मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अरविंद कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
















