परभणी : आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. दिवाळी हा सण लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एकमेकांच्या आनंदात सहभागी झाल्यामुळे देशात धार्मिक सलोखा निर्माण होतो. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात एकाचवेळी दिव्यांची रोषणाई केली जाते. अंधारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे जाणारा या सणाचा मूळ संदेश संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधतो. दिवाळी हा राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, असे प्रतिपादन जयहिंद सेवाभावी संस्था परभणीचे अध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार यांनी केले.
बोरगाव (मेघे) येथे सत्येश्वर सभागृहात सेंट थॉमस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजद्वारा आयोजित दिवाळी मिलन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रीती सत्यम, प्रमुख पाहुणे ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान राही, शाळेचे संस्थापक विजय सत्यम, साध्वी सत्यमित्रा, गोदावरी संस्थेचे अध्यक्ष मोहन मोहिते, बोरगावचे माजी सरपंच संतोष सेलूकर, समाजसेवक हाजी शेख शरीफ व हाजी शेख शेरू आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुलांनी रांगोळी, दिवे, ग्रीटिंग कार्ड, आर्ट आणि क्राफ्टच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू तसेच अनेक नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व पाहुण्यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रस्तावना प्राचार्या प्रीती सत्यम यांनी केली. संचालन रुची पांडे व शबाना शेख यांनी तर आभार प्रदर्शन श्रद्धा संत यांनी केले. यशस्वीतेकरिता वर्षा देशपांडे, संदीप जोशी, सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.
















