पूर्णा : शहरातील गजबजलेल्या टिळक रोडवरील बसवेश्वर सायकल स्पेअरपार्टच्या दुकानाला काल रविवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील टायर, ट्यूब व हवा भरण्याच्या मशीनसह आदी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत दुकान मालक स्वामी यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहरात रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन असल्यामुळे दुकानात पूजा करताना लावलेल्या दिवातील वातीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत दुकानातील मोटारसायकलचे टायर व रबरी ट्यूब असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. टायरमुळे आगीचा भडका उडाल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते.
या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांकडून आग विझविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन पथकातील कर्मचारी गणेश रापतवार, तन्वीर कुरेशी, दीपक गवळी आणि अमजद कुरेशी यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीची झळ शेजारील दुकानांना पोहोचली नाही. ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पूर्णा पोलिसांनीही त्वरित घटनास्थळ गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, बीट जमादार चाऊस, जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगरसेवक राजू भालेराव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली व गर्दीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठी आपत्ती टळली. या दुर्घटनेमुळे व्यावसायिक स्वामी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
















