परभणी : आजच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतक-यांनी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून शेतीतील जोखीम कमी करण्यावर भर द्यावा. कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती, शेतीपूरक उद्योग, मृद व जलसंधारण, आधुनिक कृषि अवजारांचा वापर तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यांची सांगड घालून शेती अधिक शाश्वत व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी दिली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने राबविण्यात येणा-या कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पांतर्गत दि. ७ नोव्हेंबर रोजी मानवत तालुक्यातील सावरगाव खुर्द (सावळी सावरगाव) येथे बियाणे वितरण व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याअंतर्गत सावरगाव खुर्द व पिंपळा येथील शेतावर एकूण ६२ प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास सावरगाव खुर्दचे सरपंच गजाननराव घाटुळ, पिंपळा सरपंच गोपाळ सूरवसे, विठ्ठलराव घाटुळ, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. पपिता गौरखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते लाभार्थी शेतक-यांना विद्यापीठनिर्मित रबी पिकांचे बियाणे तसेच विविध कृषि निविष्ठांचे वितरण करण्यात आले. यामध्ये करडईचे परभणी करडई-पीबीएनएस – १२ व परभणी करडई – पीबीएनएस – ८६, हरभ-याचे आकाश आणि रबी ज्वारीचे परभणी मोती या वाणांचा समावेश होता. रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी जीवाणू खतांचे, जनावरांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी खनिज मिश्रणाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा काटेकोर वापर, पिकांचे योग्य नियोजन आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविता येईल. विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी अशा प्रात्यक्षिकांचा निश्चितच उपयोग होईल, असेही त्यांनी नमूद केले.
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले. याप्रसंगी नारायणराव घाटुळ, परमेश्वर घाटुळ, उद्धवराव घाटुळ, हनुमान टरफले, गणेश घाटुळ आदींसह सावरगाव खुर्द व पिंपळा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुरेश खटिंग, गणेश घाटुळ, अमर राऊत, नागेश सावंत, अवचार यांनी परिश्रम घेतले.
















