लातूर : प्रतिनिधी
राज्यात अग्रगण्य असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय होऊन पुन्हा बँकेवर माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिले. सत्ता स्थापनेची मतदारांनी संधी दिली. त्याबद्दल मंगळवारी आशियाना जनसंपर्क कार्यालय येथे जिल्हाभरातून आलेल्या मान्यवरांनी सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून सत्कार पुढील यशस्वी व जनहिताच्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार करू, असे नमुद केले.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव केंद्रे, काँग्रेसचे जळकोट अध्यक्ष मारुती पांडे, जिल्हा बँकेचे नूतन संचालक संतोष पाटील, संचालक चंद्रशेखर दंडीमे, संचालक अँड. शेषराव हाके पाटील, संचालक आशिष पाटील राजुरकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक अनुप शेळके, माजी संचालक राजकुमार पाटील, जिल्हा सोसायटी संघटनेचे अध्यक्ष वीरसेन भोसले यांच्यासह मांजरा, रेणा, विलास साखर कारखान्याचे संचालक मंडळ, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील शेतकरी सभासद यांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांना जो आशीर्वाद दिला तो विजय म्हणजे शेतक-यांचा विजय असून गेल्या अनेक वर्षांपासून बँकेने अतिशय पारदर्शक कारभार करत शेतक-यांना अधिक मदत करण्याची भूमिका घेतली आहे. ही संस्था टिकली पाहिजे हे आमचे ध्येय असून सर्वांना सोबत घेऊन बँकेत पारदर्शक कारभार करू तसेच नूतन संचालक मंडळ व परिवर्तन पॅनलचे सर्व संचालक मंडळाना सोबत घेऊन चांगल काम करू, असा विश्वास सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
















