लातूर : प्रतिनिधी
समान काम समान वेतन व सुधारित वेतनश्रेणी तात्काळ लागू करावी या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या न्यायालयीन कर्मचा-यांच्या संपाला जिल्हा वकील मंडळाने पाठिंबा दिला असल्याचे लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव यांनी जाहीर केले.
यावेळी जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. लहू चामे, सचिव अॅड. येरटे, अॅड. नितीन राठोड, अॅड. सिद्धेश्वर धायगुडे, अॅड. श्रद्धा पाटील, मंजुश्री शिंदे, अॅड. अमित आर्वीकर उपस्थित होते. न्यायालयीन कर्मचारी न्यायव्यवस्थेचा कणा आहेत. न्यायालयाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी ते अहोरात्र झटत असतात. तरीही त्यांना वर्षानुवर्ष समान काम करूनही समान वेतना पासून वंचित ठेवले जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने या मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन कर्मचा-यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कर्मचा-यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू. न्याय मिळवून देणा-यांनाच न्याय मिळाला नाही तर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकेल, असे जाधव म्हणाले.
















