लातूर : एजाज शेख
ग्रामीण भागातील कलावंत आणि त्यांनी घेतलेला सभोवतालच्या सामाजिक प्रश्नांचा वेध म्हणजे हे नाटक. वगनाट्य स्वरूपातील हे मुक्त नाट्य गण, गौळण, बतावणी, सवाल जवाब, नृत्य, गाणी, उत्स्फूर्त संवाद या माध्यमातून पर्यावरण, आरोग्य, व्यसनाधीनता, वृक्षारोपण यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करत जाते. फारसे तांत्रिक चौकटींमध्ये न अडकता हे नाटक मनोरंजनातून खूप चांगले प्रबोधन करीत जाते. नाटकाचे नाव ‘बेइमानी’ असले तरी कलावंतांनी सादरीकरण मात्र ‘इमान-ईतबारे’केले. ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची लातूर केंद्रावरील प्राथमिक फेरी शहरातील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती भवनात सुुरु आहे. मंगळवारी सायंकाळी धर्मवीर राजे प्रतिष्ठान, उदगीर निर्मित, पुजा राठोड लिखित आणि तुषार राठोड दिग्दिर्शित ‘बेईमानी’ हे नाटक सादर करण्यात आले.
दिग्दर्शक तुषार राठोड यांनी या नाटकातील पात्रांची विचारपूर्वक निवड केली आहे. ईश्वर इंगळे यांनी ईश्वरची मध्यवर्ती भूमिका अत्यंत खुबीने साकारली. प्रभाकर आगळे यांची प्रभाकरची भूमिका लक्षात राहिली. बाळासाहेब कटारे, व्यंकटेश कदम यांनी अनुक्रमे मावशी व जमुना ही स्त्रीपात्रे साकारली. प्रमोद जोगदंड यांचा प्रधान, गोट्या दानाने यांची महाराजची भूमिका ब-यापैकी होती. सागर जाधव, सोहम आजणे, सोमनाथ मुंगळे, जयेश भांबरे, ज्ञानेश्वर दळवे, सरकार मुगळे, अदित्य गायकवाड यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
महेश राठोड यांची रंगभूषा, राहूल राठोड यांची वेशभूषा, अमोल राठोड यांची केशभूषा आणि सचिन जाधव यांची प्रकाश योजना नाटकाला साजेशी होती. एकुण २८ कलावंतांचा ताफा दिग्दर्शक तुषार राठोड यांनी खुबीने हाताळला. सामाजिक विषयांवर भाष्य करणारे वगनाट्य स्वरूपातील हे मुक्त नाट्य गण, गौळण, बतावणी, सवाल जवाब नाट्य रसिकांना भावले. तंत्रज्ञानाचा अभाव असला तरी समाजामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नाटकातून दिसून आला.
















