परभणी : पाथरी तालुक्यातील लोणी बु. फाटा ते गुंज खुर्द रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांच्यासह लोणी बु. ग्रामस्थांनी दिला होता. या इशा-याची प्रशासनाने दखल घेतली असून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात झाली आहे.
लोणी ते गुंज हा रस्ता अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत होता. रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणेही अवघड झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.
या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित गिराम यांच्यासह लोणी बु. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन दि. १५ नोव्हेंबर पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
या इशा-यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लोणी फाटा ते गुंज रस्त्यावर खडीकरणाचे काम सुरू आहे. जेसीबी आणि डांबरीकरणाची यंत्रणा रस्त्यावर दाखल झाली असून कामाला वेग आला आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने लोणी, गुंज, कानसूर, उमरा, गौडंगाव, आंधपुरी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रस्ता काम सुरू झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे व माजी जि. प. सदस्य रणजित गिराम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
















