परभणी : जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय मोहीम असून, तिचे काम अचूक, पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अधिकारी-कर्मचा-यांचे शंभर टक्के प्रशिक्षण आणि जनगणनेबाबत व्यापक जनजागृती करून जनगणनेची प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले.
जनगणना संचालनालय, महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७च्या दुस-या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी जिल्हा, उपविभागीय, शहर तसेच चार्ज व अतिरिक्त चार्ज स्तरावरील जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहायक यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, जीवराज डापकर तसेच जनगणना संचालनालयाचे उपनिदेशक सागर बागूल, सांख्यिकी अन्वेषक पवन गोडे उपस्थित होते. जिल्हा, उपविभागीय, शहर, चार्ज व अतिरिक्त चार्ज स्तरावरील जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक, तांत्रिक सहायक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जनगणना २०२७च्या पहिल्या टप्प्यात गृहगणनेचे काम करण्यात आले आहे. आता दुस-या टप्प्यात लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांची प्रशिक्षणातील १०० टक्के उपस्थिती महत्त्वाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून जनगणनेचे काम पारदर्शक व अचूक पद्धतीने पूर्ण करावे. महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटना आदींच्या माध्यमातून जनगणनेबाबत अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जनगणनेच्या दुस-या टप्प्यातील काम निर्धारित मुदतीपूर्वी आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करून पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
















