नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने विविध करांमध्ये केलेल्या कपातीचा लाभ कर्मचा-यांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या आयकरातील सवलतीचा उल्लेख करत मोदींनी उद्योजकांनी कर्मचा-यांचा पगार वाढवला का, नव्या लोकांना नोकरी दिली का, असा सवाल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधान मोदी यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. २०१४ मध्ये कॉर्पोरेट टॅक्सचा बेसिक रेट ३० टक्के होता, आम्ही तो कमी करून २२ टक्क्यांवर आणला. आज भारतात १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर इनकम टॅक्स आकारला जात नाही. यानंतर मोदींनी उद्योग विश्वातील लोकांना प्रश्न विचारला की, मी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकर माफ केला. तुम्ही कर्मचा-यांचा पगार वाढवला? कामगारांची संख्या वाढवली का? मोदीजी तुम्ही करा आम्ही पाहू, या प्रकारे काम चालेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्योग क्षेत्रातील लोक निर्णयामुळे कदाचित समाधानी नसतील हे माहिती असूनदेखील सरकारने आयकरात दिलासा देण्याचा निर्णय घेतला. आयकरात कपात केल्याने लोकांची खरेदी करण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आणि उद्योजकांना सरकारच्या या प्रयत्नांना स्वीकारण्यास सांगितले, असे मोदी म्हणाले. मित्रांनो आम्ही आयकरात इतका मोठा दिलासा देण्याचे धाडस दाखवले. यातून आपल्या लोकांची खरेदी करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. यानंतर त्यांनी आयटीआर फाइल करण्याच्या आणि रिफंडच्या प्रक्रियेतील बदलांचा उल्लेख केला.
आयटीआर फाईलची प्रक्रिया सोपी बनविली
केंद्र सरकारने आयटीआर फाईल करण्याची आणि रिफंड प्रक्रियेतील बदलाची सिस्टीम सोपी बनवली आहे. कारण कर देणा-या लोकांचा पैसा विनाकारण अडकू नये, असे मोदी म्हणाले. तुम्हाला माहिती असेल एक पत्र यायला अगोदर ८ महिने लागायचे, आता एका आठवड्यात रिटर्न प्रोसेस होतात की नाही, असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी केला.
















