28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रदाओस दौरा म्हणजे ‘खोदा पहाड निकला चूहा’

दाओस दौरा म्हणजे ‘खोदा पहाड निकला चूहा’

मुंबई : दाओस येथे होणा-या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिका-यांचे शिष्टमंडळ जात आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘दाओस’ दौरा म्हणजे ‘खोदा पहाड़ निकला चूहा’ असा होणार असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे.

याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘‘महाराष्ट्र पाहणार आहे की, ‘खोदा पहाड़ निकला चूहा’, मागच्या वेळी देखील असेच झाले होते. डोंगर खोदायला गेले आणि उंदीर घेऊन आले. ज्याची पाच कोटींची लिमिट नाही, त्याच्या नावावर हजारो कोटींची गुंतवणूक मागच्या वेळी केलेल्या दाओस दौ-यात दाखवली. ज्या विदेशी कंपन्या म्हणून दाखवल्या, त्या भारतीय कंपन्या निघाल्या. अशी बनवाबनवी आणि बोगसगिरी कशासाठी, महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजून अशाप्रकारे हे सरकार वागत असेल आणि हे व-हाड घेऊन गेले असेल, सरकारच्या तिजोरीतील पैशांवर पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
विशेष म्हणजे याबाबत वडेट्टीवार यांनी ट्वीट करत देखील सरकारवर निशाणा साधला आहे.

‘‘५० लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा ३४ कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दाओसला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत तिथे राज्याच्या हिताची किती कामे होतील?, दौ-याचा एकूण खर्च बघता हा दाओस दौरा सरकारच्या मर्जीतील अधिकारी, नेते आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी आहे का? हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे,’’ वडेट्टीवार म्हणाले.

जयंत पाटलांची टीका…
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील दाओस दौ-यावरून टीका केली आहे. ‘३८ कोटी रुपये या दौ-यावर खर्च होणार असल्याचे मी ऐकले आहे. मला वाटते तिथे स्टॉल लावण्यात येणार असून, तिथपर्यंत मी समजू शकतो. परंतु, येथून तिकडे जाणा-या लोकांना सुरक्षा पुरवण्यापर्यंत सगळ्या सोयी करणे हे अनाकलनीय आहे. आता बेसुमार खर्च करण्याच्या पद्धती सुरू झाल्या आहेत, आणि हेच आता चालले असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाओस दौरा सध्या चर्चेचा विषय बनला असून, यावरून त्यांच्यावर विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR