25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीय२२ जानेवारीला देशातील सर्व कोर्टांना सुटी द्या

२२ जानेवारीला देशातील सर्व कोर्टांना सुटी द्या

नवी दिल्ली : २२ तारखेला राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यापूर्वी अनेकविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. विशेष अनुष्ठान, पूजा-पाठ सुरू आहेत. राम मंदिरावरून राजकारणही तापताना दिसत आहे. देशभरात हा श्रीरामोत्सव साजरा होणार आहे. यासाठी सुटी देण्याचे आवाहन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बार काऊंसिल ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र देत, देशातील सर्व न्यायालयांना सुट्टी द्यावी, अशी विनंती केली आहे.

देशभरातील लाखो लोकांसाठी या कार्यक्रमाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रदीर्घ काळ लढल्या गेलेल्या न्यायालयीन लढाईतील विजयाचे तसेच स्वप्न साकार होण्याचे हे प्रतिक आहे. राम मंदिर सोहळ्याचे धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन नम्रपणे विनंती करतो की २२ जानेवारी २०२४ या दिवशी संपूर्ण देशातील न्यायालये जसे की, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालयांमध्ये सुट्टी घोषित करावी. यावर आपण विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

प्रभू श्रीरामांचे वैश्विक महत्त्व सांस्कृतिक आणि धार्मिक सीमांच्या पलीकडे आहे. विविध समुदाय आणि धर्माच्या लोकांच्या हृदयाला आणि मनाला स्पर्श करते. न्याय व्यवस्थेचे अखंडपणे कामकाज सुनिश्चित करण्याचे महत्त्व जाणतो. ज्या याचिकांवर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे, त्यांना विशेष व्यवस्थेद्वारे समायोजित केले जाऊ शकते किंवा शक्य असल्यास, पुढील तारीख दिली जाऊ शकते, यावर विचार करावा, असेही या पत्रात म्हटले आहे. बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी हे पत्र दिले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामललांची बहुप्रतीक्षित मूर्ती राम मंदिर परिसरात दाखल झाली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी होणा-या विधींच्या तिस-या दिवशी तीर्थ पूजन, जलयात्रा, जलाधिवास, गंधाधिवास हे विधी पार पडणार आहे. त्यानंतर औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR