नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) यापुढे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्डला वैध दस्तऐवज मानणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या आदेशानंतर ईपीएफओने जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या अगोदर २२ डिसेंबर २०२३ रोजी यूआयडीएआयने आधार कार्डचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु तो जन्मतारखेचा पुरावा नाही, असे निर्देश जारी केले होते. त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा म्हणून द्यावयाच्या कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्यात आले आहे, असे ईपीएफओने स्पष्ट केले. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीत जन्मतारखेचा पुरावा म्हणून आता आधार ग्रा धरले जाणार नाही, असे म्हटले. म्हणजेच आता आधार कार्डचा वापर जन्मतारीख अपडेट करण्यासाठी किंवा त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी करता येणार नाही. कारण आता ईपीएफओने आपल्या वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्डला वगळले आहे.
यूआयडीएआयने आपल्या परिपत्रकात आधार हा १२ अंकी आयडी आहे. तो भारत सरकारने जारी केला आहे. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभर वैध आहे. त्यावर जन्मतारीख दिलेली असते, पण ती जन्म पुरावा म्हणून वापरू नये, असे म्हटले होते. त्यावरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने १६ जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले. त्यात युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ला आधार कार्डाबाबत वरील सूचना जारी करण्यास सांगितले होते. त्यानंतरच ईपीएफओने जन्मतारीख बदलण्यासाठी आधार कार्डची वैधता थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर ईपीएफओच्या वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये आधार कार्डबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात आधार कार्ड कुठे वापरले जाणार आणि कुठे वापरले जाणार नाही, हे सांगितले होते. बँक खाते आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. युजीसी, सीबीएससी, एनआयएफटी आणि महाविद्यालये इत्यादी संस्था आधार कार्डवर लिहिलेल्या क्रमांकाची मागणी करू शकत नाहीत. शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर आवश्यक राहणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी ही आहेत वैध कागदपत्रे
-जन्म आणि मृत्यू निबंधकाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
-मान्यताप्राप्त सरकारी मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट
-नाव आणि जन्मतारीख असलेला शाळा सोडल्याचा दाखला
-केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवा रेकॉर्डवर आधारित प्रमाणपत्र
-आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड
-शासनाने जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र
-सिव्हिल सर्जनने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र