काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्याचा प्रभाव दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्येही जाणवला. भूकंपाचे केंद्र जाजरकोट येथे होते. रात्री ११.४७ वाजता झालेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या या भूकंपात कर्नाली प्रांतातील जाजरकोट आणि रुकुम पश्चिम भागात सर्वाधिक नुकसान झाले असून १३३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते भंडारी म्हणाले की, जाजरकोटमध्ये ९२ आणि रुकुम पश्चिममध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जिल्ह्यांत १४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते कुबेर कडायत यांनी माध्यमांना सांगितले की, जाजरकोट आणि रुकुम पश्चिम जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे आणि त्यांचे लक्ष बचाव आणि शोध मोहिमेवर आहे. नेपाळने पोलीस, लष्कर आणि सशस्त्र दल देखील तैनात करण्यात आले आहे, याशिवाय हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी ३० जणांवर रुकुम पश्चिम येथे तर १०० हून अधिक जणांवर जाजरकोट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूकंपानंतर अनेक ठिकाणी भूस्खलनाचे वृत्त आहे, त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यात अडचणी येत आहेत.
शुक्रवारी रात्री आलेला भूकंप नेपाळमध्ये २०१५ मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतरचा सर्वात प्राणघातक भूकंप मानला जात आहे. २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये ७.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, सुमारे ९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले, १० लाख घरांचे नुकसान झाले आणि सुमारे २८ लाख लोक विस्थापित झाली.
भारत सर्वतोपरी मदतीसाठी उभा
नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, नेपाळ भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि हानीमुळे खूप दुःख झाले आहे. भारत नेपाळच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमची भावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. भारत सर्वतोपरी मदतीसाठी उभा आहे.