छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. तसेच हा दबाव आणखी वाढवण्यासाठी आपण जरांगेंच्या भेटीसाठी आल्याचे संभाजीराजे म्हणाले. मनोज जरांगे यांच्या पुढच्या लढ्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी मी इथे आलो. मला आनंदाने सांगायचे आहे की, त्यांची रिकव्हरी चांगली आहे.
ते म्हणाले की, डॉक्टरांनी जी लिव्हर आणि किडनीला सूज सांगितली होती, ती आज कमी झालेली आहे.
त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज घेण्यापेक्षा मी सांगितले आहे की, जास्तीत जास्त दिवस त्यांना इथे ठेवावे. पूर्ण रिकवर झाल्याशिवाय त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करु नये. हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी, जेणेकरुन कमीत कमी लोक त्यांना भेटावीत. शक्यतो भेटूच नयेत, असा मी त्यांना सल्ला दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जरांगेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीसुद्धा चर्चा केली.