वॉशिंग्टन : एलियन्स हा जगातल्या प्रत्येकासाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे. त्यात आता एलियन्सच्या डेड बॉडी सापडल्याचा प्रकार समोर आला. यामुळे खळबळ उडाली आहे. एलियन्स कसे दिसतात हे प्रत्यक्ष पाहिले नाही पण मग त्यांच्या डेड बॉडी कशा दिसत असतील? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता लागली आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध जादूगार युरी गेलर यांनी एलियन्सची डेडबॉडी पाहिल्याचा दावा केला. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाकडे एलियन्सचे ८ मृतदेह असल्याचा दावा गेलर यांनी केला. आपण स्वत: हे मृतदेह पाहिल्याचे गेलर यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले. त्यामुळे युरी गेलर आणि नासाच्या कामाबद्दल विविध प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
नासाचे एक इंजिनीअर आणि अंतराळवीर मला गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये घेऊन गेले. वॉशिंग्टन डीसीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मेरीलँडमध्ये असलेल्या या केंद्रात खूप खोलवर एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेतील खास डीप फ्रीझर आणि काचेच्या डब्यात एलियन्सचे मृतदेह ठेवण्यात आल्याचा दावा युरी गेलर यांनी केला.
माझ्यासोबत जर्मन रॉकेट अभियंता वेर्नहर वॉन ब्रॉन आणि अंतराळवीर एडगर मिशेल देखील होते. प्रयोगशाळेत तीन वेळा पाय-या चढून एलियन्सच्या मृतदेहापर्यंत आम्ही पोहोचल्याचे त्यांनी पुढे सांगितले. तिथे जाण्यापूर्वी मला उबदार कोट देण्यात आला होता. त्यावर नासाचा लोगो होता. त्या प्रयोगशाळेला हॉस्पिटलसारखा वास येत होता, असेही ते पुढे म्हणाले.
एलियन माणसासारखा
गेलर यांनी एलियन्स कसा दिसत होता, याचे वर्णन केले. एलियन्सचे शरीर मानवासारखे होते. त्याची उंची लहान होती, त्याचे शरीर पातळ होते आणि डोके खूप मोठे होते, असे ते म्हणाले. एलियन्सचे मृतदेह पाहिल्यानंतर या बॉडी त्यांच्या अपघातानंतरच्या असाव्यात असे त्यांना वाटले.
नासाने जगापासून लपवली माहिती?
गेलर यांनी या मुलाखतीत अमेरिकेतील बड्या नेत्यांचे नाव घेतले. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांना एलियन्सबद्दलचे सत्य माहित असल्याचा गेलर यांचा दावा आहे. अमेरिकेत अनेक लोकांनी एलियन्सच्या उपस्थितीबद्दल दावा केला, मात्र नासाने त्यांचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळे नेमके सत्य काय? हे अजून मोठे गुपितच आहे.