मुंबई : वर्ष २०२३ संपायला अवघे दोन महिने शिल्लक असून, यंदा अधिकमासामुळे अनेक जोडप्यांची लग्नं लांबणीवर पडली होती. तर मार्च, एप्रिल महिन्यांत विवाह मुहूर्त एकही नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्नं रखडली होती. मे महिन्यात काही जोडप्यांची दणक्यात लग्न झाली हिंदू समाजात पितृपक्षात विवाह केले जात नाहीत, त्यामुळेदेखील लग्न झाली नाहीत; आता मात्र विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना या दोन महिन्यांत जोरदार लग्नांचा बार उडवता येणार आहे. तर पुढील वर्षभरातदेखील लग्नांचे बरेच मुहूर्त आहेत.
मुहूर्त पाहूनच अनेक इच्छुक वधू-वर बोहोल्यासाठी उभे राहतात. २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी नंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. मात्र, मे महिन्यातील उकाडा आणि आधीच फुल्ल झालेले हॉल पाहता अनेक जोडप्यांनी आपले लग्न पुढे ढकलले. जूनमध्ये मुहूर्त असले तरी लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांनी पावसाळ्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यातच अधिकमास आला इतकेच काय तर पितृपक्षामुळेदेखील अनेक विवाह रखडली.
लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना जूननंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्न करण्यासाठी नातेवाइकांची लगबग सुरू झाली आहे. सभागृह, लॉन, हॉटेल्स तसेच मंगल कार्यालये बुक केली जात आहेत.