कोलंबो : क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाने केलेला पराभव श्रीलंकंन क्रीडामंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी टोकाचे पाऊल उचलत, अख्खा क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, भारताविरुद्ध तब्बल ३०२ धावांनी श्रीलंकेचा पराभव झाला. त्यातच विश्वचषकातून संघ बाहेर पडल्याने श्रीलंकेने प्रशासनाने पूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचे पाऊल उचलले. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेंने विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात श्रीलंकेने केवळ २ विजय मिळवले.
श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली आहेत. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारलाच, पण आता त्यापुढे जात थेट क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
क्रीडामंत्र्यांनी ‘तलवार’ उपसली
क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी शुक्रवारीच आपली तलवार उपसली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्ड हा देशद्रोही आणि भ्रष्ट आहे अशी जहरी टीका त्यांनी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी बोर्डाच्या सदस्यांकडे राजीनामे मागितले होते. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा जे दुसरे मोठे पदाधिकारी आहेत, त्यांनी राजीनामा दिला होता.
अर्जुन रणतुंगाच्या हाती धुरा
दरम्यान, क्रीड मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अन्य सदस्यांनाही बरखास्त करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी विश्वविजेता माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखालील एक अंतरिम समिती नियुक्त करण्यात आली आहे. या ७ सदस्यीय समितीमध्ये अर्जुन रणतुंगा यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील दोन निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश आहे.