होशियारपूर : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथून मालगाडी (१४८०६आर) चालक-रक्षकाशिवाय पंजाबमध्ये पोहोचली. सुमारे ७८ किलोमीटरपर्यंत मालगाडी अशीच धावत राहिली. होशियारपूरमधील उची बस्सी रेल्वे स्थानकावर लाकडी स्टॉपर लावून ती रोखण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.
कठुआ रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या चालकाने इंजिन सुरू केले आणि हँड ब्रेक न लावता खाली उतरले. पठाणकोटच्या दिशेने उतार असल्याने मालगाडी पुढे जाऊ लागली. मालगाडी धावल्याची माहिती रेल्वे अधिका-यांना कळताच त्यांनी कठुआ रेल्वे स्थानकावर ती थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. काही वेळाने मालगाडीचा वेग वाढला. काही वेळातच मालगाडीचा वेग ८०/किमी प्रति तास झाला.
कठुआ रेल्वे स्थानकाच्या अधिका-यांनी तत्काळ पंजाबमधील पठाणकोट येथील सुजानपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे अधिका-यांशी संपर्क साधला. तेथेही ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वे मार्गावर स्टॉपर्स लावण्यात आले होते. यावेळीही प्रयत्न फसला आणि मालगाडीने स्टेशन ओलांडले. यानंतर पठाणकोट कँट, कांदोरी, मिरथल, बांगला आणि मुकेरियन येथे मालगाडी थांबवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. हळूहळू मालगाडीचा वेग कमी होऊ लागला. शेवटी होशियारपूरच्या उची बस्सी रेल्वे स्थानकावर लाकडी स्टॉपर लावून मालगाडी थांबली.
तपास सुरू
जम्मू रेल्वे विभागाच्या वाहतूक व्यवस्थापकाने सांगितले की, घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संभाव्य सुरक्षा त्रुटी ओळखण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अधिकारी अशा घटना टाळण्यासाठी कठोर सुरक्षा प्रोटोकॉल लागू करणे, नियमित देखभाल तपासणी आणि योग्य ट्रेन ब्रेक आणि सिग्नलिंग सिस्टमची खात्री करणे यासारख्या खबरदारीचे उपाय घेत आहेत.