मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाने मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या अफवेमुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. पण तो आता दूर करण्यात आला आहे, असे म्हटले. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण ही अफवा म्हटल्याने यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली. या भेटीत छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनामधील शंका मी दूर केली, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे नव्याने वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. शासनाने जो जीआर काढला होता, त्याच्या मेरिटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातात. कुणबी प्रमाणपत्र व्हेरिफाय झाल्यानंतरच दिले जाते. त्यामुळे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल, ही अफवा ओबीसी नेत्यांमध्ये होती. त्यामुळे छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते मला भेटले. त्यानंतर त्यांच्या मनातील शंका दूर करण्यात आली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही
कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने संभ्रम मनात बाळगू नये. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे-जे करावे लागेल ते सर्व आम्ही करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.