धाराशिव : सुभाष कदम
धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघ धाराशिवसह लातूर, सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत विस्तारलेला आहे. मतदारसंघाची व्याप्ती व २० लाख मतदारसंख्या पाहता कोणत्याच उमेदवाराला प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. या मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार, विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अशी थेट लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे बंडखोर (शिंदे गट) बार्शी येथील भाऊसाहेब आंधळकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
या मतदारसंघात सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत, तर फक्त एक आमदार शिवसेनेचा (ठाकरे) आहे. त्यामुळे कागदोपत्री महायुती बलाढ्य दिसत असून महाविकास आघाडी कमजोर दिसत आहे. मतदारांच्या मनात नेमके काय आहे, त्यांचा कौल कोणाला, बुद्धिजीवी वर्ग कोणाच्या बाजूने मतदान करणार, याचा अंदाज अजून कोणालाच आलेला नाही. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर असा थेट सामना होत आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात तुळजापूर येथे महायुतीतील भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील, उमरगा-लोहारा येथे शिवसेनेचे (शिंदे गट) ज्ञानराज चौगुले, औसा येथे भाजपाचे अभिमन्यू पवार, बार्शी येथे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, परंडा-भूम-वाशी मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) प्रा. तानाजीराव सावंत असे पाच विधानसभेचे सदस्य आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शिक्षक आमदार विक्रम काळे हे धाराशिव तालुक्यातील पळसप येथील रहिवासी आहेत. पदवीधर आमदार सतीश चव्हाण हे लोहारा तालुक्यातील भातांगळी येथील आहेत. तसेच धाराशिवचे संपर्क मंत्री संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे आहेत. अशी भक्कम राजकीय नेत्यांची फळी महायुतीच्या बाजूने आहे.
याउलट महाविकास आघाडीमध्ये कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे एकमेव शिवसेनेचे (ठाकरे) आहेत. परंडा मतदारसंघाचे माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, माजी आ. राहुल मोटे हे ओमराजेंच्या बाजूने आहेत. ओमराजे निंबाळकर या तिघांना घेऊन बलाढ्य महायुतीच्या बलाढ्य उमेदवाराविरुद्ध तगडी फाईट देत आहेत. देशासह महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या वळणावर गेल्यानंतर लोकसभेची निवडणूक होत आहे. मतदारांचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, हे समजेनासे झाले आहे. सध्यातरी महायुतीच्या बलाढ्य उमेदवाराविरुद्ध आघाडीच्या ओमराजेंची एकाकी झुंज सुरू आहे, असे म्हणावे लागेल.