राणीसावरगाव : गेल्या काही दिवसांपासून पारा ४२ अंशापर्यंत गेल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. दुसरीकडे विद्यार्थी, नागरीक यांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत आहे. परंतू या ठिकाणी गेल्या ५० वर्षांपासून बसस्थानक नसल्याने प्रवाशांना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाड किंवा दुकानाचा सहारा घ्यावा लागत आहे.
राणीसावरगाव येथील नागरीकांना बाहेरगावी जाण्यासाठी एसटी बसच्या फे-या वेळेवर नसल्यामुळे प्रवाशांचे उन्हामध्ये हाल होत आहेत. येथे मागील ५० वर्षापासून बसस्टँड करण्याची प्रवाशांची मागणी आहे परंतू बस स्टॅन्ड नसल्यामुळे प्रवाशांना दुकान किंवा झाडाखाली सावलीचा सहारा घेत थांबावे लागत आहे. विद्यार्थी, नागरिक यांना वेळेवर बस मिळत नसल्यामुळे याचा फायदा खाजगी वाहनधारकांना होत आहे. जादा पैसे आकारून व एका गाडीत पासिंगच्या दुप्पट मानसे भरून जिवघेणा प्रवास उन्हाळ्यात प्रवाशांना करावा लागत आहे. याकडे लक्ष देवून प्रशासनाने राणीसावरगाव येथे बस स्टँड बांधल्यास प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस याचा त्रास होणार नाही असे मत प्रवाशांतून व्यक्त होत आहे.